आणखी काही कविता
उत्सव
-------
नव्या कोऱ्या पैठणीचा
वास भरभरुन घेते
घडी मोडली..आयुष्य
आज नवेच जगते..!
पानापानातून जशी
फुलं फुलून हासली
तशी तुझ्या मिठीत ही
काया टवटवीत झाली..
रंग ऋतुंचा लागला
माझ्या रेशमी गालास
ओल्या मातीचा सुवास
आला धुंद प्रणयास..
तुझ्या मौनात दडला
किती युगांचा पाऊस
तोच झेलीत सुखाने
मन चालले लयास..
आसपास नाही कुणी
कुणी नकोही यायला
नव्या जन्माचा उत्सव
तुझ्यासाठीच चालला..
©रमेश यशवंत वाकनीस©
८/६/१९९३
Comments
Post a Comment