अक्षय तू
अक्षय तू
-----------
अक्षय तू अक्षय मी
अक्षयात उजळाया
जगलो नि जगण्याचे
व्रत आहे मरणाप्रत..
मरणाहून सुंदर ही
भूक नव्या जन्माची
जन्मावर रुसलेल्या
जीवातुन फुलवावी
सुमने ही सृजनाची..
सृजनाचा अर्थ नवा
शब्दातच शोधावा
शब्दांच्या नाद लयी
सृष्टीतुन ऐकाव्या
सृष्टीचे सृष्टीपण
सृष्टीतुन विरघळते..
दृष्टीचा उघडोनी
डोळा,हा गेला क्षण
गेला क्षण माघारी
परतावा सांग कसा
आला क्षण जाताना
जाईल रे रिक्त कसा..
भरभरुन ओंजळ घे
मौक्तिक हे उधळाया
ज्ञानाचे पायस घे
अक्षयात हो विलीन..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
Comments
Post a Comment