अशोक
अशोक
---------
अशोकाची सावली
तुझ्या घरात डोकावत असतानाच
कधीतरी माझी पावलं
तुझ्या अंगणात येऊन थांबतात
व्याकुळतात, भिरभिरतात..
डोळ्यांची पाखरं..
तुझ्यासाठी..तुझ्या भोवती.
नुक्तीच शंभोऽ करुन,
दूध पिऊन झोपलेल्या
शांत..स्वस्थ..
तान्ह्या मुलासारखा..
तुझा दिवाणखाना,
किती सुरक्षित वाटतय त्याला
तुझ्या अस्तित्वाच्या उबदार कुशीत..!
मधला पडदा बाजूला सारला की
आत स्वयंपाकगृहात तू
हवीहवीशी..
स्वत:च्याच तंद्रेत गुणगुणणारी..
हरवणारी..
काय करावं? वाजवावी कां बेल?
नको.
या बाळाची झोप मोडेल..!
अशोकाला सावली सोडेल..!
ही दुपार आता तुझ्या घरात
विरघळून गेली आहे पूर्ण.
तू आणि तू
भरुन राहिली आहेस सर्वत्र
खरंच,
किती तृप्त आणि समाधानी आहे
हा उंच हिरवागार अशोक..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment