आणखी काही कविता

म्हातारा:एक स्वगत
------------------------
आता भार अस्तित्वाचा
सहन होत नाही
जगतो आहे..
जगवले पाहिजेच की शरीर..
मरण येत नाही..
साठवणीतले पक्षी-
आठवणीत येतात..
काळीटोचून टोचून कुरतडून कुरतडून तसू तसू खातात माझं..
आतड्याचे धागे चिवट,
लांबच लांब.. विस्कटतात.. हरवतात..
हरवतात उभं आयुष्यच
वजा करुन जमा केलेल्या
चीज-वस्तू-
आपल्याच हातानं कुठे ठेवतो कोण जाणे..
हा चष्मा एक साला
नाकावरुन सारखा गळून पडतोय..
कोण जाणे..
सगळं जिथल्या तिथे आहे की नाही?.. पण-
पण इथेच कुठेतरी होती ती डायरी
अथ पासूनच्या साऱ्याच
नोंदी होत्या त्यात.
कुठून येतात हे प्रकाशाचे दोन कवडसे माझ्या अंधाऱ्या घरात?
धुंडाळतो आहे..धुंडाळतो आहे मी
केंव्हा पासून,
केव्हा पासून या अनाथ मुलाच्या डोक्यावरची‌ सावली-
आईनं नाकारलेली..
जगानं झिडकारलेली..
धुंडाळतो आहे..
कळतं आहे धुंडाळणंही तसं व्यर्थच..
वैय्यर्थाचं हे गाणंच
आपलं असतं..
इथं जवळ,
आसपास..दूरवर..
गातय कां कुणी कुणासाठी?..
स्वत:चाच आवाज नीट
ऐकू येत नाहीसा झालाय म्हणून-
म्हणून बोलत बसतो मोठमोठ्यांदा
स्वत: जवळच कान लावून..
ऐकाऽरेऽ
कुणी बंद कराल कां तो टिव्ही?
आता भार अस्तित्वाचा
सहन होत नाही..
जगतो आहे,
जगवल पाहिजेच की शरीर..
मरण..
सावली..
मरणसावली..
मरणसावली..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
९/८/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७