चाफा ४
चाफा ४
असंख्य
जख्ख राठ बोटांवर तुझ्या
एकेक पांढऱ्या पाकळ्यांचे फुल
उमलू लागते तेंव्हा-
वैराण वाळवंटातून खळाळत्या
निर्झराचे निळे धवल
संगीत वाहू लागते...
बेलगाम अश्वांच्या टाचांखाली
चिरडला गेलेला काळ
पुन्हा जीवावर उदार होऊन उठतो
नव्या जीवनाची नवी
आवर्तने घेत..
अस्फुट हुंदक्यांची एक कथा
मी तशीच अर्धी ठेवून
उठलो आहे आयुष्यातून..
शब्दात बांधता आली तर बांध तू.
©रमेश यशवंत वाकनीस©
(पिवळा चाफा हिरवे पान मधून)
Comments
Post a Comment