ती
ती
---
स्वरांचा एक पक्षी
मनगटी ठेवून ती एकटीच बोलत असते..
समोरच्याला वाटतं,
ती आपल्याशीच बोलतेय..
पक्षी,
पक्षी पंख फडफडावतो
समोरच्याला वाटतं,
ती आपल्याकडे बघूनच
डोळे मिचकावतीय
पक्षी,
पक्षी टुकुटुकु मान हलवत
इकडून तिकडे पहात राहतो
समोरच्याला वाटतं,
ती आपलाच शोध घेतेय.
पक्षी,
अचानक काहीतरी
सापडल्यासारखं करुन-
उंच आकाशात झेपावतो..
समोरच्याला वाटतं,
ती आपल्यालाच आव्हान देतीय
समोरचा,
न कंटाळता येत येत राहतो
कधी तिला,कधी स्वत:ला आजमावून बघतो
स्वरांचा एक पक्षी
मनगटी ठेवून ती एकटी
बोलतच असते...
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment