आणखी काही कविता
कविता
---------
उगवते आहे
नवे आकाश..नवे स्वप्न..
तुझ्या डोळ्यात..
परम प्रकाशाच्या स्नेहानं
भरली आहेस काठोकाठ..
आता कशाला हवी आहे
सोबत तुला?
कधी पासून तुझे एकटेपण
हुंदडते आहे माझ्या अंगाखांद्यावर
किती करावेत लाड?
किती पुरवावेत हट्ट?
आता वाटेतच फतकल मारुन
याने पसरलय भोकाड..
आपटते आहे पाय-
मागते आहे काय काय..
दोन रट्टे घालून पाठीत,
याला फरफटत बरोबर नेण्यापेक्षा
असंच रडवत ठेवून निघून जावे म्हणतो..
तुझे स्वप्नं.. तुझे आकाश..
तुझे पाश तोडून जरा-
तुलाही मुक्त करावे म्हणतो..!
©रमेश यशवंत वाकनीस© २२/१२/१९९८
Comments
Post a Comment