चाफा ५

चाफा ५
चाफ्याच्या झाडाखाली,
आणाभाका घेतलेला सुगंधी दिवस
तिने डायरीतल्या पानात
बंदीस्त करुन ठेवला..
पुढे जरुर भासेल
आणि संधी सापडेल तेंव्हा
डायरी उघडण़
शब्दाआड दडलेल्या त्याच्या
ओठांवर आपले ओठ हळूच टेकवणं..
आठवणींचे मेघ जमा होऊन
डोळे ओले होणं..
सगळं आपोआप घडू लागलं
कधी भेटलाच तो-
तर ती त्याला कविता मागते
तो हसतो.
ती म्हणते,'आपण आऊटींगला जाऊ'
तो पहात राहतो तिच्या डोळ्यात
तिची मान खाली झुकते
त्याच्या गळ्यातल्या गाण्याच्या
चिठोऱ्या चिठोऱ्या करुन
उधळलेल्या कडकडीत उन्हाचं
थारोळं तिच्या पदराआड पसरतं..
आणखी एक दिवस
तिला न सांगता
तिच्या डायरीत शिरतो..
त्या दोघांची भेट घालून दिली
त्या दिवसाच्या ऋणात
तिला त्याच्या घरापुढे चाफा
लावायचा होता
पण काळरात्रीच्या उदरात
मरुन गेलेला तो दिवस-
तिच्या डायरीत पुन्हा उमलणार कसा?
पुरावा नष्ट केला तरी मोगऱ्याला
चाफ्याचा सुवास येणार कसा?
आता दिवसांच्या उघड्या डायरीत
वाऱ्यावर फडफडणारी ही सकाळ
ती, तिचं आयुष्य अन् मी.
©रमेश यशवंत वाकनीस©
(पिवळा चाफा हिरवे पान मधून) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७