आणखी काही कविता
नव्या युगाचे निर्माण
---------------
नव्या युगाचे निर्माण
ठेवा दारे उघडून
आला जगाचा हा मित्र
वारा सांगे वर्तमान..
आला सानुला छोटुला
माझ्या अंगणात तान्हा
विश्व उध्दाराचे वेळी
कसा आवरु मी पान्हा
याच्या अधरी विलसे
सुख शांती समाधान..
आला जगाचा हा मित्र
वारा सांगे वर्तमान..!
स्वप्न संकेतच होता
बुध्द येणार येणार
तुझ्या पावला पुरता
तुला प्रकाश देणार
तुझ्या प्रकाशात पहा
किती तेजाळली मनं
आला जगाचा हा मित्र
वारा सांगे वर्तमान..!
भल्या-बुऱ्याचा विचार
मार्ग हिताचा धरावा
कास न्यायाची धरुन
समभाव आचरावा
प्रश्न सरतील सारे
सत्य शाश्वत शोधून
आला जगाचा हा मित्र
वारा सांगे वर्तमान..!
पहा डोकावुनी आत
बुध्द मनात जनात
साधे जीवनाचे सूत्र
जगा आणि जगू द्यात
कसे तेवते अखंड
महाकारुणिक मन
आला जगाचा हा मित्र
वारा सांगे वर्तमान..!
प्रेम,अहिंसा, कोरडे
नाही शब्द अनुभव
ज्याने घेतला जाहला
धन्य धन्य तो मानव
जग उजळीत आला
अंतर्बाह्य उजळून
आला जगाचा हा मित्र
वारा सांगे वर्तमान..!
बोधिसत्वाच्या अवस्था
दहा,एक तरी जाणा
फेरा जन्मांचा विसरा
ध्यास निब्बाण धरा ना
होता सुमेध चालला
धर्ममेध हा होऊन
आला जगाचा हा मित्र
वारा सांगे वर्तमान..!
©रमेश यशवंत वाकनीस©
४/१२/२०००
Comments
Post a Comment