उत्सव
उत्सव
-------
निळेच अंबर निळीच धरती
निळेच पाणी कृष्णेचे
निळ्या डोंगरा मधून वैभव
शांत जाहल्या तृष्णेचे..
रंग रुप विर्घळुनी गेले
उन सावल्या ना उरल्या
निराकार निर्गुण त्या धारा
ह्रदया मधुनी पाझरल्या..
नीरवतेला कंठ फुटोनी
थवे उडाले शब्दांचे
गूढ जाहली निगूढता
अन् थकून बसली ही वाचा..
चैतन्याचा मूल स्रोत हा
आधी होता उगमाच्या
गती मिळाली स्थिती लयातच
उत्सव भरले सृजनाचे..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
Comments
Post a Comment