ओळ
ओळ
------
उध्वस्त सांजवेळेला मी
क्षितीज सांधत बसतो
वाऱ्यावर फडफडणारे
आयुष्य स्वरातुन जपतो..
नभ मंद निळे तेजाने
ताऱ्यांच्या नाहून जाते
सावळ्या सखीची काया
शब्दात तशी मोहरते..
आश्वासक हातांच्या मग
विळख्यात मोकळी होते
मातीची दग्ध कहाणी
मातीतच झिरपत जाते..
कृष्णाला ठाऊक नव्हते
विश्वाचा मांडून खेळ
कोणत्या क्षणाच्या काठी
प्रलयाची लिहीली ओळ..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळे चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment