शय्या

शय्या
---------
जड झालेल्या पापण्यांखाली
कुठून कुठून जमा होतात पाखरं..
एकमेकांना चिकटून चिकटून
दाटीवाटीनं बसून राहतात,
डोळे मिटून.
घुमत राहतात त्यांच्या कंठात
आकाशगाणी..
किंचित विलग झालेले
माझे लालचुटुक ओठ ओठात..
अंग फिरणारी बोटं बोटातच गुंतून-
कळत नाही,
कसा ध्यानीमनी नसता
माझ्या शय्येलाच उगवतो-
हा साजण..!
गाढ..घट्ट मिठी..सैलावते
शिथिल झालेली गात्रं,
उठून निघून जातात गात्रातून..
दारावर थाप-
एकदा दोनदा तीनदा
जड झालेल्या पापण्या
उघडतच नाहीत
कुठून कुठून जमा झालेली पाखरं
घुमायची थांबतच नाहीत
वाढत जातात..
फक्त दारावरचे आवाज..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७