पिवळा चाफा हिरवे पान
मनोगत
----------
कविता लिहू लागलो तेंव्हा दलित कवी आणि कविता दोघेही फार्मात होते.सामाजिक बांधिलकी,जातीभेद,विषमता,एकूणच व्यवस्थे विरुध्द दंड थोपटून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेऊन प्रत्यक्ष चळवळीत उतरणे,असे सगळे गरमागरम वातावरण होते.आज देखील सामाजिक कवितेचा बोलबाला उच्च रवात चालूच आहे. पण बाहेर कितीही गोंगाट असला तरी मलानेहमी माझाच आवाज ऐकू येत राहिला. समाज सुधारणा त्या दिशेने जाणाऱ्या चळवळी वगैरे आवश्यक आहेतच.तरी देखील ज्या सामान्य माणसाच्या सर्वांगिण विकासासाठी हे सर्व सुरु आहे तो 'माणूस' अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त आहे.हा 'माणूस' निर्दोष होणं आवश्यक आहे.हे जोवर घडत नाही तो पर्यंत कोणतीही समाज व्यवस्था ही सदोष असणारच आहे.हे माझं मत किंवा प्रतिक्रिया म्हणजे माझी सुरुवातीच्या काळातील कविता होती.विद्रोही कवींच्याच शैलीत अतिशय आक्रमकपणे मी स्वत:वरच चहू बाजूने हल्ले चढवित होतो.शेवट अर्थातच स्वत:लाच चारीमुंड्या चीत करण्यात झाला. पण पराभव मानेल तो कवी कसला.. त्याचा पुन्हा जन्म झाला.चित्तशुध्दीचा अनुभव घेतलेला,सर्वाभूती प्रेमाचा साक्षात्कार झालेला हा कवी स्वत:ला सर्व दोषांसकट स्विकारुन प्रेमाचा महिमा गाऊ लागला.माणूस म्हणून स्वत:कडे आणि जगाकडे अधिक मोकळ्या स्वच्छ दृष्टीने पाहू लागला.समजून घेऊ लागला. हे सगळं मुद्दाम लिहीण्याचे कारण इतकेच की 'करीता कवित्व न होती संत' हे जरी खरे असले तरी प्रेमाने कविता लिहीत राहिला 'माणूस'तर ही लेखनाची प्रक्रियाच त्याला मता मतांच्या गलबल्यातून मुक्त करते आणि त्याचा संबंध 'तत् ' शी जोडते असा माझा अनुभव आहे.माझ्या पुरता तो फार खरा आणि महत्वाचा आहे.म्हणूनच माझी कविता सामाजिक न होता 'प्रेमॅजिक' झाली याचा मला आनंद आहे.या संग्रहाच्या रुपाने हा आनंदच मी रसिकांच्या ह्रदयात उधळून टाकत आहे.कविता लेखनाच्या दुसऱ्या टप्प्यावरील या कवितांमध्ये वृत्तांचे वैविध्य फारसे आढळणार नाही.कारण मुद्दाम तसा प्रयत्नही मी कधी केला नाही,करतही नाहीच.ह्रदयातून सहज ओठावर ज्या लयीत शब्द आले ती कविता.कुठे कुठे ही कविता सांकेतिकही वाटेल,आणखीही काही दोष असतील.परंतू कवी हा अस्सलतेच्या,सर्वोत्तम कवितेच्या शोधात निघालेला एक यात्रिक असतो.या यात्रेत ती त्याला कधी गवसते,कधी चकवा देऊन निघून जाते.नेम नसतो.अनुभवांना,अनुभूतींना प्रामाणिकपणे सामोरे जाऊन ते सारे अचूकपणे शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे एवढेच त्याच्या हातात असते.माझ्याकडून हा प्रयत्न होत गेला.या कविता वाचकांच्या ह्रदयाशी थेट संवाद साधतील असा मला विश्वास वाटतो. दुसरी एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे ती म्हणजे हे मनोगत वाचून सामाजिक विषयांचे मला वावडे आहे असा कुणी अर्थ घेऊ नये.सहज सुचल्या तेंव्हा तशाही कविता लिहील्या पण या संग्रहात त्यांचा समावेश मुद्दाम केलेला नाही.पिवळा चाफा हिरवे पान मधील या कविता एका विशिष्ट मनोवस्थेतील आहेत.रसिकांच्या हाती हा संग्रह ठेवत असताना कवी मनोहर लोंढे या माझ्या मित्राची तीव्रतेने आठवण येतेच पण पिंपरी चिंचवड मधील मंजुषा मेंगे,शांताराम गायकवाड,अशोक कोठारी,मधु जोशी,अशोककुमार त्रिभुवन, राजेंद्र देव,सुभाष सरीन,या कवी मित्रांनाही विसरता येणार नाही. या सर्व मित्रां बरोबर कवि संमेलनात कविता वाचू लागलो,शब्दगंधच्या माध्यमातून साहित्यिक उपक्रमांच्या आयोजनात रस घेऊ लागलो.कालौघात यातील काही मित्रांच्या सहवासाला मुकावे लागले.काही आजही बरोबर आहेत.मुख्य म्हणजे या सर्वांच्या सहवासात फुललेली कविता माझ्या जवळ आहे.याचा आनंद आहे.प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिकसन्मित्र गिरिश प्रभुणे यांनी या संग्रहा करीता रेखाचित्रे काढली आहेत.फारा वर्षापूर्वी त्यांनी माझ्या रुबायांवर काही तैलचित्रे काढली होती.तसे एक प्रदर्शन भरवायचे मनात होते पण ते तसेच राहून गेले.यातील रेखाचित्रे म्हणजे आम्हा दोघामधील स्नेहाची व रसिकतेची खूण आहे.संवेदना प्रकाशनचे नीतीन हिरवे यांनी या संग्रहाची निर्मिती अतिशय प्रेमाने केली.त्यांना धन्यवाद.
या शिवाय असे अनेक सुह्रद आहेत ज्यांच्या सहवासात मला शिकायला मिळाले.त्या सर्वांचाच नामोल्लेख करता येणे शक्य नसले तरी त्यांच्या विषयी आदरभाव,कृतज्ञता,कायम मनात राहिल.शेवटी माझी पत्नी सौ अरुणा,मुले,आई,वडील,बहीणी या सर्वांचे कौतुक,प्रोत्साहन होते, आहे म्हणूनच मी काही करु शकतो आहे.असो.
आता या संग्रहाचे स्वागत कसे होईल,समीक्षक काय म्हणतील,पुरस्कार मिळतील की नाही,अशा गोष्टींची चिंता करायचं मला कारण नाही.पण जो कोणी रसिक या कविता वाचेल तो स्वत:मधल्या प्रेमभावार फिदा होईल असा विश्वास व्यक्त करतो व थांबतो.
रमेश यशवंत वाकनीस
Comments
Post a Comment