आणि इतर कविता..क्रमश:..

४
एक संध्या..

एक संध्या अशी सुध्दा
रक्तकमळ प्रकाशाची..क्षितीज केसाळ गुहांची..थोडी उडणाऱ्या पाखरांची..
आणि नंतरच्या -
असीम अस्मितेच्या दागिन्यांनी मढलेली
उरात विलक्षण गढलेली..
अरुणेच्या गर्भाची
एक संध्या..
एक संध्या अशी सुध्दा
वरुणाच्या पूजेची,धरतीच्या खरपूस जखमांची..वाळूत उमलणाऱ्या तेलाची..
मीठात भिजलेल्या फुलांची..
अहंतेच्या नाशाची..
संभ्रमाच्या गन्तव्याची..
उत्फुल्ल फुलत जावी..
एक संध्या..
एक संध्या अशी सुध्दा
मुशाफिरांची हाराकीरी लुटून
उध्वस्त होण्याची..
समुद्राच्या प्रगाढ शांतल दीपस्तंभात
उभं राहण्याची..
रात्रीच्या विळख्यात मरुन
पडलेल्या श्वापदांची..
गर्दिच्या आक्रोशात विलीन व्हावी..
एक संध्या..
एक संध्या अशी सुध्दा..
कळण्याची वळण्याची..
ईश्वराला भेटण्याची..भेट होता थेट जावे
फुलवित सारे मानसबन
अथांग पाणी वाजत रहावे..
आत बाहेर जगत जावे साक्ष ठेवून
एक संध्या.
५
चामडीस व्यालो

भोगातून समाधीला ज्ञानया निघालो
चामडीस व्यालो आम्ही चामडीस व्यालो

खरे पोट ज्याचे त्याचे करावा कशाला
प्रेम धर्म मानवतेचा उगा बोलबोला?
दु:ख जीवनाचे आम्ही पुरेपूर प्यालो..

सदाचार संस्कृतीचा जळो पाठ आता
मुले थोर झाली विसरा असे थोर माता
लाज का असावी आम्हा निलाजरे झालो..

कसा अर्थ द्यावा आम्ही निरर्थास वेड्या
क्षणाचीच मुक्ती आणि क्षणाच्याच बेड्या
पूर्ण पशू म्हणूनी आलो चिरंजीव झालो..

चामडीस व्यालो आम्ही चामडीस व्यालो
६
मूर्तीमंत

तांबड्या लाल फुलांच्या देशात
होता एक राजपुत्र
त्याला स्वप्न पडायची परीराणीची
मग जायचा तो काळ्या घोड्याला
टाच मारुन मातीवरची सत्ये चिरडत
गुहेतल्या राक्षसाची शेंडी उपटून
बेंबीतलं रक्त पाजायचा तो
सोनेरी पिंजऱ्यातल्या पोपटाला..
हलकेच परीराणी फुलपाखरा सारखी
समोर येऊन बसायची-
मूर्तीमंत मोहा सारखी..!!
पोपट 'मिठू मिठू' म्हणत निळ्या
आकाशात पसार झालेला पाहून
परीराणीला घेऊन जायचा
राजपुत्राला धीरच व्हायचा नाही
तो द्यायचा तिला आश्र्वासन
जादूची सतरंजी आणण्याचं आणि
जायचा निघून..
इथं राजपुत्राची कथा संपते आणि
परीराणीची सुरु होते..
तिच्या सोबतीला आहेत आता-
सात समुद्र.अंधारात बुडालेली झाडे
आणि सतरंजीवरुन येणारा
तो एक राजपुत्र.
७
तुटलेय एकतारी

ज्यांनी आम्हास इतुकी वस्त्रे बहाल केली
त्यांनीच जीवनाची वस्ती बकाल केली

पंचा सुटून त्यांची ही पाटलोण आली
ही लाजली कशी ना?ही सांग कोण आली..

त्या चिरगुटात होती जी चाड संस्कृतीची
ती आज रेशमाच्या धुंदीत खाक झाली..

खुलते नि बंद आता व्यापार राजरोस
कष्टा विनाच मिळवा मुल्ये नवीन आली..

व्यवहार राजनीती शिकतील सर्व आता
ही शुध्द भामट्यांची विद्यापिठे निघाली..

साधू-महात्म्यांची तुटलेय एकतारी
भजनास विठ्ठलाची अख्खी शिवीच झाली

सौंदर्य पूजकांच्या शहरात राऊळांची
सांभाळण्या प्रतिष्ठा वेश्या-गृहे निघाली..

माझ्या परंपरेच्या विद्वान रक्षकांनो -
कां सोवळ्यास तुमच्या ही ओवळीच व्याली

हा प्रश्न‌ आसवांचा की फक्त वासनांचा
तुमचे तुम्हीच ठरवा ही नागवी निघाली..
८
सुर्वात

सुर्वातच अशी झाली
त्याला आपण काय करणार?
तहान-भूक सागराची -
त्याला ओंजळ पुरी पडणार?

राक्षसाला पाय फुटतात
मध्यरात्री कान दुखतात..
बाबा म्हणतात आईसाठी
केसाळ पंजे दूर झुरतात..

दऱ्या-खोऱ्या जंगल-वाडे
आतल्या आत रोज कण्हतात
महाकाळा समोर म्हणे-
सारी दु:खे गळून पडतात..

बाबा पुढे बोलत नाहीत
डोळे मिटून फक्त हसतात..
तूच सांग देवा तुझी -
मुले इतकी कां रे रडतात?..

सुर्वातच अशी झाली
त्याला आपण काय करणार?..

.


Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७