४० हळू शिंपला मिटवावा
सरुन जाईल रात सखे
पण आठवणी या सरतिल कां?..
तुझ्या नि माझ्या दिव्य प्रीतीचे
स्वर्ग धरेवर वसतिल कां?..
अजून आहे अंधाराचे सावट
कां अवती भवती?..
श्रीमंती बघ लेक पोसते
गरीब रोगट वांझोटी
दूर होऊनी दु:ख मनाचे
डोह सुखाने हसतिल कां?..
असह्य होते रोज पाहणे
कत्तल जीवन मुल्यांची
बेहोषीतच कुठे चालली
घोडदौड या मुडद्यांची?..
सिंह झोपले उरी गाढ ते
पेटून आता उठतिल कां?..
अज्ञानाची हद्द जाहली
ज्ञान म्हणावे मिथ्याला
माणूस खाईल माणूस
आता रोज चिरडुनी सत्याला
बघून रांजणे शत पापांची
गत पुण्याई स्मरतिल कां?..
आळवावरच्या थेंबासाठी
सागर शोषून कां घ्यावा?
थेंब होऊनी सागरातला
हळू शिंपला मिटवावा..
या मातीचे प्रेम हवे तर
प्रेमासाठी मरतिल कां?..
मानवतेच्या मंदिरातला
देव भुकेला प्रेमाचा-
विश्व जन्मले प्रेमा मधुनी
प्रेमातच हो लय त्याचा
नीत ह्रदयाचा प्रसाद देऊन
सांग कुणी हा जगविल कां?..
तुझ्या नि माझ्या दिव्य प्रीतीचे
स्वर्ग धरेवर वसतिल कां?..
Comments
Post a Comment