आणि इतर कविता..


आणि इतर कविता : आता पर्यंत आपण डाॅग शो या एकूण १८ कवितांचा आस्वाद घेतला.आता याच संग्रहातील आपल्या पुढे ठेवणार आहे.जरुर वाचा.आपला अभिप्राय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे...
१
गाडी :

माझ्याच गाडीत बसून अहो
माझीच गाडी धावते आहे
माझेच सिग्नल‌ बघून अहो
माझ्यातच ती थांबते आहे..

इंधन सतत पेटते आहे-
माझेच अंतर गिळते आहे
माझीच शिट वाजवित अहो
माझेच अपघात टाळते आहे..

किती लांब जायचे आहे
त्याला काही क्षितीज नाही
तोच माणूस,तीच व्यथा
तिची कथा संपत नाही...

गाडी माझी ईश्र्वराची देन आहे
गाडी माझी अनंताचा वेध आहे
थांबूनही माझ्यातच ती..
किती युगे धावते आहे
दिल्या शब्दा आकाशाच्या
अजूनही जागते आहे..
२
रावे :

नको नको म्हणून सुध्दा
हवे हवे सुटत नाही
नंगा राघव भेटून सुध्दा
वस्त्र लोभ फिटत नाही..

घेत नाही देत नाही
साधा व्यवहार कळत नाही
सारे भांडे फुटून सुध्दा
भांडण माझे मिटत नाही..

कमाल आहे आभाळाला
उलटे बघता येत नाही
असो असो कुणी सुध्दा
सुलटे पाऊल टाकत नाही..

कितीही झाकलेत कोंबडे तरी
उजाडल्या शिवाय रहात नाही
काही तरीच म्हणता राव
आम्हाला काय कळत नाही?
हिरवे रावे उडवून साव -
चोर काय पकडत नाहीत?..
३
कुठे हासरे तारे

'आई आई' म्हणून सारखे
हे पोर बिचारे रडते..
कुठून त्याची आई आणू
दु:ख मनाला होते..

अंधार भोवती कसा दाटला
कुणास ठाऊक नाही..
मध्येच कैसी सोडून गेली
कुठेच माया नाही..

तोच आरोळी दूर दूर कां
ह्रदय फाडुनी गेली..
हां हां कळले अन्नाविण हो
याची आई गेली..

पाप करोनी बाप पळाला
शिक्षा त्याची याला..
मुखी कुणाच्या अमृत आणि
मिळते वीष कुणाला...

अजुन सानुला टाहो फोडून
मलाच पुसतो आहे..
सुन्न वाट ही मला लक्तरे
कशास दावून राहे..

असेच आहे जगती सारे
कुठे हासरे तारे..
जगात आहे भूक म्हणोनी
भूकच याला मारे..

आता कसा हा जगेल सांगा
कोण काळजी करतो..
अपूर्ण आहे जो तो म्हणुनी
सदा पूर्णता बघतो..

जरा वितीचा खणुनी खड्डा
घ्या हो त्यात समाधी..
हे पोर असे कां उघडे?-
त्याचे अश्रू पुसा हो आधी..!!






Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७