३५ शेला
उतरली उन्हे हा वर
आला एकांत..
पाऊले थांबली हातात
देऊनी हात..
सावळ्या नदीची अभंग
तृष्णा वाहे..
खडकावर कोणी तशीच
व्याकुळ आहे..
हिरव्यात गारवा नाचून
हासतो मंद..
हा कुण्या जिवाचा सुटला
कस्तुरगंध..
हे सारस पक्षी दूर
चालले कोठे?..
सांगावा समजुन येईल
कां तो येथे?..
केसात मुलायम श्वास
चालले दूर..
क्षण सुखात वाटे युगे
जाहली चूर..
चोरुन अंग ती आपुल्याच
मनाशी लाजे..
गुलबक्षी संगे गुलाब
पाहुन ताजे..
ह्रदयात स्वप्न ओठात
मेहुडी गाणी..
तो अजून म्हणतो-
'येईन उद्या मी राणी..'
उदयास बांधला असा
रात्रीचा शेला..
अर्धाच डाव की सुरु
करोनी गेला..
अन् शोध लागला अखंड
दोघा पाठी..
चालले तळाला अश्रूच
घेऊनी गाठी..
पाऊले कोवळी ह्रदया
वरती पडली..
मृत्यूस घेऊनी जीवन
हसले गाली..
Comments
Post a Comment