रमेश यशवंत वाकनीस यांची समग्र कविता

नमस्कार..रसिक मित्रांनो..!

' वा ' साहित्य संगत या ब्लाॅगवर आपले मना पासून स्वागत करतो.या ठिकाणी माझ्या १९७५ पासूनच्या सर्व कविता आपल्याला वाचायला मिळणार आहेत. १९८६ साली माझा पहिला कविता संग्रह श्री शब्द प्रकाशना तर्फे प्रकाशित झाला.त्याचे नाव होते ' पूर '.या संग्रहासाठी म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान प्राप्त झाले होते.संग्रहाचे बाड मंडळाकडे पाठवले तेंव्हा त्याचे शीर्षक ' डाॅग शो आणि इतर कविता ' असे दिले होते. परंतू मराठी पुस्तकाला मराठीच नाव असा आग्रह मंडळाच्या तज्ञज समितीचा होता.मी तडजोड केली.ती न करता अनुदान नाकारण्याचा एक पर्याय होता.पण मग संग्रह प्रकाशित झाला नसता. कारण अर्थातच पैसा.असो.आज एवढ्या वर्षा नंतर मी त्यातील कविता ' डाॅग शो आणि इतर कविता ' हेच शीर्षक देवून आपल्या पुढे ठेवित आहे. या कविता पुरेशा बोलक्या आहेत त्यामुळे त्यांच्या विषयी अधिक काही न लिहीता सरळ कवितांचाच आनंद आपण घ्यावा.या संग्रहाला कोणत्याही जेष्ठ कवीची किंवा समिक्षकाची प्रस्तावना मी घेतली नव्हती घ्यावीशी वाटली नव्हती हेच याचे वेगळेपण....

डाॅग शो
--------
१
हमरस्त्यावर पहा होऽऽ
मरुन पडले आहे कुत्रे..
दोन दिवसापूर्वी ते चंद्रमौळी झोपडीच्या
चौकटीत उभे राहून असेच भुंकले..
आतडे फुटे पर्यंत.
मग कुबट नाल्यात उबट थुंकले,
आज ते मरुन पडले आहे..

पहा होऽऽऽ
गर्दीचे थवे उडाले आहेत..
दोन दिवसांपूर्वी ते खांद्यावरच्या झोळीत
हात हलवत असेच कुंथले
डोळ्याचे पारणे फिटे पर्यंत,
मग एक दिवस असेच उलथले
पावलांच्या नियतीखाली
हमरस्त्यावर...
२
कुत्रेच अहो पाळून पाहिले
दात विचकून भुंकून पाहिले
माती उकरून थुंकून पाहिले
पुन्हा पुन्हा कान टवकारून
माणूसपण जोखून पाहिले.
बरे वाईट जगता जगता...
श्वासा श्वासात कुत्रेच पाळले
कुत्रेच अहो पाळून पाहिले ! !
३
उगाच भिजल्या कुत्र्या सारखा
दारात उभा राहू नकोस
काय हवंय चटकन सांग
जमीन हुंगत पाहू नकोस.

ठाऊक आहे मला तुझी..
भूक किती मोठी आहे
भोगायची तर भोग तुझी
आई सुध्दा मादीच आहे

अरे,पापालाही हींमत लागते !
निष्पाप निर्मळ मन लागते ! !
म्हणून फक्त माणसालाच..
कुत्र्या सारखे शेपूट नसते ! ! !
४
  हे सारे पिसाळलेले कुत्रे..
  माझ्या अवती भवतीचे, झोंबताहेत मला
  घास करु पाहताहेत माझ्या सर्वांगाचा..
  जे जे घेवून येतात खोटं..
  त्यांना त्या कुत्र्यांना सापडणार नाहीत
  माझे अवयव..
  मला मी बांधून ठेवलं नाही कधीच.
 
  पावलागणिक आग भडकतीय
  माझ्याही पोटात..तरी सुध्दा चंद्रनिर्झर
  शांतता विलसते आहे माझ्या
  आकाशातल्या अवकाशात..
  यांना पेलवणार आहे कां ही?..
  कसे हे पिसाळलेले कुत्रे..
  माझ्या अवतीभवतीचे.

५
बघता बघता गल्ली मधून
सगळी कुत्री पसार झाली
होती एक ती सुध्दा..
टाकून पिले तयार झाली..

कुणालाच कळत नव्हते
आपण कुठे चाललो आहोत
गळ्यात पट्टे नाहीत पण
पाय मात्र चाटतो आहोत..

नेतील तिथे जाऊ लागली
देतील तेच खाऊ लागली
आमची माती आमची कुत्री
अशी प्रजा वाढू लागली..

एकूण काय सर्वत्र..
कुत्र्यांचेच राज्य झाले
काळी कुत्री पांढरी कुत्री
सारे भेद नाहीसे झाले..

गळ्यात गळे घालून कुत्री
दिवस रात्र भुंकत असतात
हाती सत्ता आमच्याच आम्ही
सुखी होऊ म्हणत असतात..

बाकी एक बरे झाले..
माझे शेपूट आत होते
नाही तर माणसा सारखे
कुत्रे मी ही पाळले असते..
६
ही आयुष्य पोखरुन टाकणारी
तहान तू मला कां दिलीस?
माझ्या डोळ्यांची बाहुली..
तू इतकी लहान कां केलीस?

आता मला माणसात दिसतात श्वापदं
आणि श्वापदात माणसं..
ती सारीच माझा पाठलाग करताहेत..
जीव मुठीत धरुन मी धावतो आहे
रानोमाळ...

आता एक कर..
ही तहान तरी संपव
नाही तर
या डोळ्यांची बाहुली तरी
विझवून टाक, कायमची.
७
भगव्या कफनीत भूत
आणि हिर्व्या लुंगीत लूत
मर कुत्र्या दिसेल त्या..
दगडावरती मूत..

कळेल तेंव्हा कळेल तुझे
प्रेम-गोंडा घोळ..
स्व:त:च्याच शेपटा भोवती
फिरत रहा गोल..

तुझाच सदा बळी जाऊन
माणसं माजली फार
भुंक कुत्र्या भुंक आता
फिर दारोदार..
८
तुझ्या गळ्यात पट्टा
माझ्या गळ्यात पट्टा
मधे हा धट्टाकट्टा..

कधी तू माझ्यावर गुरगुरायचे
कधी मी तुझ्या वर गुरगुरायचे
कधी तू मला चाटायचे
कधी मी तुला चाटायचे
आणि मग असे एकमेकांत
अडकवून बसायचे..
ह्याच्या वंशाच्या दिव्या खाली
उजाडस्तवर वाट पहात
तसं रोजच उजाडतं पण..
हा साला तुकडे फेकतो..!!
असं जगण्यापेक्षा आपण
मरुन कां नाही जात?

तुझ्या गळ्यात पट्टा
माझ्या गळ्यात पट्टा..
चाललो आहोत...
९
नीतीमत्ता कुत्र्यांची ही पार बिघडली
कुत्री आपले कुत्रेपणच विसरुन गेली..
काल जी एकमेकांना चाटत होती
आज ती स्वतःलाच चाटत गेली..

भाद्रपदात तर विचारुच नका
दर्शनही दुर्लभ झाले साऱ्या इच्छाच मेल्या
गल्लीत गपगार पडून राहिली..
इथे रात्र खायला उठते..
माणसेच इतकी भितात का ?
सारी पापे करुन सुध्दा-
सारीच निष्पाप म्हणून सुटली !!!
नीतीमत्ता कुत्र्यांची ही अशी बिघडली.
१०
पोरे तुझी अडाणचोट
कर शेपूट सरळ
तिची सवय जुनीच आहे
रात्री ओकते गरळ
मेलास तरी संपणार नाही
असली तहान छाताडात
झेलत रहा घाव नवे
शोधत फिर पाताळात
प्रश्न प्रश्न उभे दारात
उत्तराचं लिंग उठतय
भोग अंधाराची मादी
तिची देखील पेंग उडतीय.
११
माणसाचा जन्म झाला
तेंव्हाच आम्हाला लूत भरले
मातीचे तुकडे तुकडे करुन
ज्याने त्याने घशात घातले .

आम्ही मात्र
अकारण अपराध्या सारखे
याच्याच दारात विव्हळत राहिलो
त्याचे अर्थही विपरीत लागले.

पण तो होता निषेध-
मातीवर उभं राहून आभाळाशी
इमान सांगणाऱ्या
ह्याच्या उलट्या काळजाच्या वृत्तीचा
आमच्या पासून सदोदीत सावध
राहणाऱ्या शूर माणसा
माती हे तुझ्या एकट्याच्या
सुखाचं साधन नव्हे
आणि
कुत्रा हा मारुन मरणारा विषय नव्हे.
१२
कळपा मध्ये कळलेच नाही
केंव्हा शेपूट बाहेर आले
भुंकता भुंकता कोरडे तोंड
अचानक ओले झाले

हात आले ,पाय आले ,
पोटाचेही भान आले
कष्ट करुन लाचारीने
हसता देखील छान आले.

दारोदार घोटाळताना
मागचे सारेच विसरत आलो
दुसऱ्यालाच काय स्वतःलाही
बेमालूम फसवत आलो.

काहीच घडले नाही कसे?
तसे खूपच बदल झाले
कालचे साव पडून भाव
आज चोरांना सामील झाले.

नाही कसे म्हणू अगदी
हवे होते तसेच झाले
पाने पुसत मुल्यांना हे
मानसन्मान चालत आले.

दुःखे पहात अवती भवती
' प्रारब्ध ! ' म्हणून गेलो
एका चतकोर तुकड्यावर मग
मोकळेपणी रडता आले.

आपल्या पेक्षा आपले शेपूट
असे अखेर थोर झाले
बाकी हे ही अटळ मित्रा
व्यवस्थेचे उपकार झाले.
१३
मागील मरण पहात जा
पुढे सुतक पाळीत जा
जगता जगता स्वःसाठी
असाच चिता रचित जा..

शब्द शब्द जपून‌ मांड
जगून भांड त्वचेशी
तुटेल मान पण इमान
जागते ठेव भुकेशी..

कुणासाठी अडू‌ नकोस
कुणासाठी कुढू नकोस
कोणी नसते कोणाचे हे
ऐकून गाणे रडू नकोस..

तुझ्या माझ्या श्वासालाही
वास येतोय स्मशानाचा
हाच आणि इतकाच आहे
अर्थ अख्ख्या जन्माचा..

माणूस असून माणसा सारखा
वागला नाहीस तर थुंकतील
उद्या पुन्हा हीच माणसं
कुत्र्या सारखी रोज भुंकतील..

म्हणून म्हणतो मागील मरण
पहात जा...पहात जा..
अन् रचलेल्या चितेवरती
जळत जा...जळत जा..
१४
कुत्र्याचा माणूस आणि माणसाचे
कुत्रे झाले..त्यात एवढे काय झाले?
रडू नकोस माझ्या पिला
व्हायचे होते तेच झाले..

कोणा पेक्षा कोण श्रेष्ठ
हा इथे झगडाच नाही
जगण्यासाठी विकतात काय-काय-
त्यात एवढे काय झाले?

एका शून्याच्या जांभईला
अर्थ तरी किती द्यायचा
आता होते सगळ्याचीच माती
त्यात एवढे काय झाले?..

१५

घराघरात कुत्रे हे पाळायलाच हवे
घरभेदे मन आपले जाळायलाच हवे
असे नाही की हे तुला सांगायलाच हवे
ज्याने त्याने आपल्या दारी जागायलाच हवे.

१६
उफ् ! हे धुकं..
धुकं..धुकं.. धुकं.. धुकं..घनदाट..
हे कुत्रं अंगावर धावून कां येत नाही?
नुसतंच भुंकतय-
आदमी कुत्तेसे बढकर वफादार?
हे फारच झालं !
काय ते?..

हेच धुकं. काही कळायलाच मार्ग नाहीय
तसं म्हणजे दिसतंय..मागचं..पुढचं..
अगदी जवळचं..तुम्ही तेऽ
छे, हो ते तर कधीच मेले.
मेले? - कुत्ते की मौत?
नाही.पटत नाही.

आता काय म्हणावं तरी?
मग तुम्ही कोण?
अं ?
खरंच,काही ओळखच लागत नाहीय.

१७
वर आकाश..खाली माती..
शेपूट आत घालाल किती?

जमेल तितके काळे करा
त्या काळ्याचे पांढरे करा

भरल्या पोटी रडाल किती?
एकजूट...फाटाफूट..
करा म्हणते लुटालूट..!
ही व्यवस्था बदलाल किती?

भिकार धर्म भिकार सण..
मंगल मूर्तीऽऽ बुडवा क्षण..
या दगडांना पुजाल किती?..

संत आले ,पंत आले ,
शून्यालाही अर्थ आले..!!
नुसते चरण , आचरण किती?

कुणाचे हो ' वाजले ' इथे
उष्टी शिते ,जमली भूते,
या पत्रावळी टाकाल किती?..

खाली मुंडी पाताळ धुंडी
न संपणारी घसरगुंडी..
द्या झोकून सावराल किती?.

भुंकते आहे एक मात्र-
कुत्राळलेली काळी रात्र..
शिकार सारीच..शिकारी किती?

वर आकाश...खाली माती..!!!

१८
तिच्या समोर वीष होते
तिने ते पाणी समजून पिवून टाकले.
तुझ्या विषयी मी काही ब़ोललो नाही
बोलणारही नाही .

उर्वरीत आयुष्याचे तुकडे
तुझ्या पुढ्यात आहेत,ते चघळत रहा
बरळत रहा स्वतःशी असाच.
तीन डगऱ्यांवर पाय ठेवून
शीळ घालत अदृश्य झालेला रस्ता..
दिसला ना तुला?

अमूर्त ते मूर्त रुपानं घडवायला
फार मोठी किंमत द्यावी लागते-
आपण देतो आहोत का ती? मग?

तिच्या समोर वीष होते
तिने ते पाणी समजून पिवून टाकले
तुझ्या विषयी मी काही बोललो नाही
बोलणारही नाही.

  

 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७